22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयशरद पवारांचे फोटो वापरणार नाही

शरद पवारांचे फोटो वापरणार नाही

अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

मुंबई : अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यापुढे शरद पवारांचे फोटो वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडून सादर करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले होते. शरद पवारांचे फोटो का वापरता? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला होता.

शरद पवार यांचे फोटो वापरले जात असल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोर्टात विचारणा करण्यात आली होती. यावरून कोर्टाने अजित पवार गटाला फोटो वापरणार नाही असे लिखित द्या, असे आदेश दिले होते. त्यानंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी होत आहे. पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे. पक्ष आणि चिन्ह कोणाचे या मुद्यावरून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचे असल्याचा निकाल दिला होता. या निर्णयाला शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले आहे. दोन्ही गटाचे वकील सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत आहेत.

अजित पवार गटाने वेगळ्या चिन्हाचा विचार करावा अशा आशयाचे वक्तव्य देखील सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी दरम्यान करण्यात आले होते. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, सुप्रीम कोर्टाने केवळ सूचना दिल्या आहेत. कोणताही आदेश दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यास वेगळ्या चिन्हाचा विचार केला जाईल. सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणीकडे लक्ष असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार बहुसंख्य आमदारांसोबत महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. खरी राष्ट्रवादी कोणाची यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिला आहे. मात्र, या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले गेले असून सुनावणी सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR