मुंबई : प्रतिनिधी
पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ कवडीमोल भावाने हडप केली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा सवाल करताना भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. शेतक-यांना मोफत नको म्हणणा-या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या रोग जडला आहे असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
पुण्यातील जमीन प्रकरणाबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून या कंपनीचे भागभांडवल फक्त १ लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासांत मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिका-यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
राज्यातील मोठा स्कॅम
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून ‘सारखे मोफत कसे मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतक-यांना देणा-या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. मग शेतक-यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुस-याचे ते कारटं, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.

