नाशिक : देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर काही ठिकाणी हेलिकॉप्टरने उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या देखील हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. पंकजा मुंडे या शिरूर येथून हेलिकॉप्टरने नाशिकला येणार होत्या. मात्र, आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि उद्योजकांसोबत बैठक होणार होती. ही बैठक आता रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, साकिनाका येथील एका धार्मिक स्थळाच्या वरती काही क्षणांसाठी एक ड्रोन सदृश वस्तू दिसली होती. त्यानंतर ती झोपडपट्टी भागाच्या दिशेने गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले. ही माहिती सहार विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.