मुंबई : राज्यामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. पुण्यानंतर मंगळवारी पवारांची यात्रा मुंबईत पोहोचली. मुंबईमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.
नवी मुंबईतल्या मानखुर्द येथे रिक्षा चालकांसोबत अजित पवारांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एका काळी-पिवळी टॅक्सीमध्ये बसून प्रवास केला. टॅक्सी चालकाशीही त्यांनी संवाद साधला. अजित पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुंबईतील पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती होती. अजित पवारांनी थेट जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी टॅक्सीतून प्रवास केलेला व्हीडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवारांना बघण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी रस्तावर दुतर्फा गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांच्या रॅलीला समर्थन दिले. अजित पवार यात्रेच्या माध्यमातून महिला, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी आंबेगावमधील यात्रेमध्ये बोलताना लोकसभेसारखा दणका विधानसभेला न देण्याची कळकळीची विनंती जनतेला केली होती.