गोंदिया : येऊ नको म्हटले तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था अजित पवार गटाची झाल्याची जोरदार टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. महायुतीच्या सर्व्हेमध्ये अजित पवारांना फक्त १२ जागा मिळतील, मग बाकीच्या २८ आमदारांचे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असल्याने दादांनी बिहार पॅटर्ननुसार मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असेल असा टोलाही कोल्हे यांनी लगावला. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा ही भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौ-यावर आहे. त्यावेळी अमोल कोल्हे बोलत होते.
अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे बिहार पॅटर्न राबवून मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचे वृत्त आहे. त्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्व पटेल यांच्या बालेकिल्लांमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज यात्रेचे आगमन झाले. त्यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शिवस्वराज यात्रा ही स्वाभिमानासाठी काढलेली यात्रा आहे. मी प्रफुल्ल पटेल यांच्यावर बोलणे एवढा मोठा नेता मी नाही. ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब, आपसे तो ये उम्मीद न थी. महायुतीच्या सर्व्हेमध्ये ७ ते १२ जागा अजित पवार गटाला दाखवत आहेत.
त्यामुळे इतर आमदार आपल्या संपर्कात आहेत का असा प्रश्न केला असता अमोल कोल्हे म्हणाले की, शरद पवारांसोबत जे ठामपणे उभे राहिलेत त्याच्याविषयी प्रश्न नाही. परंतु जे आता वारा बघून उड्या मारण्याच्या तयारीत आहे त्यांच्याबाबत त्या ठिकाणचे कार्यकर्ते आणि पवारसाहेब निर्णय घेतील.
मुलगा कुणाचाही असो, कारवाई झाली पाहिजे
नागपूर अपघात प्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलांची गाडी आहे. मात्र या प्रकरणात सत्ताधारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पुणे प्रकरण असो की वसई प्रकरण असो, नेत्याच्या मुलांनी एखादी घटना केली तर त्या प्रकरणावर पडदा टाकण्यात येतो. तसेच या प्रकरणावर सुद्धा अशाच प्रकारे महायुती सरकार पडदा टाकत असेल तर हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे नाही असा लोकांच्या समज होईल. ज्यांनी गुन्हा केला अशांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.
भंडा-यात जास्तीत जास्त जागा लढणार
गोंदिया भंडारा विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट किती जागा लढवेल यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, याबाबत बैठका सुरू आहेत आणि तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. गोंदिया आणि भंडारामध्ये भेल प्रकल्प असो की विमानतळ प्रकरण असो, याबाबत जनतेने पाहिलं आहे. म्हणूनच दोन्ही जिल्ह्यातील लोकांना पवारसाहेबांवर विश्वास आहे आणि त्यानुसार जयंत पाटील जागेचे ठरवतील.