परभणी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्या हत्येमागील खरा मास्टरर्माइंड शोधून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. या प्रकरणी आरोपींना मकोका लागल्यास एकदा आत गेले के पुन्हा बाहेर येणार नाहीत. या प्रकरणात आका तर गेलाच पाहिजे. परंतू जर आकाच्या आकाने काही गडबड केली असेल तर आकाचा सुध्दा नंबर सुध्दा लागो शकतो असा इशारा आ. सुरेश धस यांनी परभणीत मूक मोर्चाला संबोधीत करताना दिला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणा-या सर्व आरोपींना तातडीने अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी शनिवार, दि.४ जानेवारी रोजी परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय, सकल मराठा समाज व अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मूक मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या प्रतिमेसह हजारो नागरीकांच्या उपस्थितीत हा मोर्चा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला.
या मूक मोर्चात मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, खा. बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योतीताई मेटे, खा. संजय जाधव, माजी आ. सुरेशराव वरपुडकर, माजी आ. सुरेश देशमुख, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. ऍड. विजयराव गव्हाणे, आ. राजेश विटेकर आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, संतोष देशमुख प्रकरणी सभागृहात आयजी लेव्हलच्या अधिका-याच्या अधिपत्याखाली एसआयटी दाखल झाली पाहीजे अशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. तसेच न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. कारण चुकून एखादा पोलिसांकडून सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहीजे. संतोष यांच्या मारहाणीचा व्हीडीओ आकाला दाखवलाच असेल आणि आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी तो पाहिला असेल तर आकाचे आका करलो जल्दी तयारी अब है… असे म्हणत आ. धस यांनी निर्वाणीचा इशारा दिला.
हा मूक मोर्चा महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात या मोर्चाचा समारोप झाला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मूक मोर्चात देशमुख यांच्या मातोश्री, बंधू, बहिण, मुलगी व मुलगा सहभागी झाले होते. कुटुंबियांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चा दरम्यान ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.