27.6 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्रशिर्डीतील सर्व व्यवसाय रात्री ११ नंतर बंद

शिर्डीतील सर्व व्यवसाय रात्री ११ नंतर बंद

गुन्हेगारीविरोधात सुजय विखे पाटलांचा निर्णय

शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१२ फेब्रुवारी) सायंकाळी शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिर्डी ग्रामस्थ, पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तब्बल सात कलमी कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.

या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, रात्री अकरा वाजेनंतर शिर्डीमधील सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद राहतील. अगदी चहाचे दुकान देखील खुले राहणार नाही. रात्री साडेअकरानंतर शिर्डीत विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई असेल. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

शिर्डीत एकाप्रकारे संचारबंदीचाच फॉर्म्युला राबवला जाणार आहे. ‘शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट’ स्थापन करण्यात येणार असून त्या अंतर्गत शिर्डी नगर परिषद हद्दीतील सरकारी जागेतील सर्व मंदिरं ताब्यात घेतली जातील. खंडोबा मंदिर, हाजी अब्दुलबाबा समाधी, लक्ष्मीआई मंदिर, मारुती, शनि, गणेश मंदिर आणि इतर मंदिरांचे खासगी ट्रस्ट बरखास्त करण्यात येतील. तसेच शिर्डीत बाहेरून येणा-या व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्यात येणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

डोअर-टू-डोअर व्हेरिफिकेशन
पुढे त्यांनी सांगितले, शिर्डीतील प्रत्येक व्यक्तीचे डोअर-टू-डोअर व्हेरिफिकेशन केले जाणार असून यासाठी आऊटसोर्स पद्धतीने काम देत बाहेरील व्यक्तीचे नाव मतदारयादीतून वगळण्यात येणार आहे. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या दहा अधिकारी आणि कर्मचा-यांचे पथक शिर्डीत तैनात राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR