नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने चार आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. या चार आरोपींमध्ये नीलम आझाद, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि मनोरंजन डी. यांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी १५ दिवसांची कोठडी मागितली होती. या चौघांपैकी सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी घोषणाबाजी करत संसदेच्या आवारात धूर पसरवला होता.
दिल्ली पोलिसांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, घटनेवेळी वापर करण्यात कॅन महाराष्ट्रातून खरेदी करण्यात आला होता. आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. अशा परिस्थितीत आरोपींना लखनौ, गुरुग्राम, म्हैसूरसह अनेक ठिकाणी न्यावे लागणार आहे. त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करावी लागेल. बैठक कोठून झाली, पैसे कोणी दिले, या सर्व गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. या कारणास्तव १५ दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.
दिल्ली पोलिसांच्या या युक्तिवादावर आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, तपासासाठी ५ दिवसांचा रिमांड पुरेसा आहे. त्यानंतर पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, त्यांनी संसद भवनाच्या सुरक्षा उपसंचालकांच्या तक्रारीवरून आयपीसी आणि यूएपीएच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सागर आणि मनोरंजन यांनी संसदेच्या गॅलरीत पास मिळवले आणि नंतर सभागृहात उडी मारली आणि त्यांच्या बुटात लपवलेल्या रंगीत बॉम्बचा वापर केला. हा एक सुनियोजित कट आणि भारतीय संसदेवर हल्ला असल्याने ही घटना दहशतवादी कृत्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.