तेलअवीव : गाझा पट्टीत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणतेही परिणाम दिसत नाहीत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास एकही ओलीस जिवंत ठेवणार नाही, असा इशारा हमासने इस्रायलला दिला आहे. हमासच्या इशा-यानंतर इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हमासच्या सशस्त्र शाखेचे प्रवक्ते अबू ओबेदा यांनी एका टेलिव्हिजन मुलाखतीत सांगितले की, फॅसिस्ट शत्रू आणि त्याचे गर्विष्ठ नेतृत्व किंवा त्याचे नागरिक, समर्थक आणि त्यांच्या कैद्यांना कोणत्याही देवाणघेवाणीशिवाय किंवा वाटाघाटीशिवाय आणि मागण्या पूर्ण केल्याशिवाय जिवंत घेऊ शकत नाहीत. हमासचे प्रवक्ते ओबेदाह म्हणाले की, हमास इस्रायली सैन्याशी लढत राहील. ते म्हणाले की, या रानटी कब्जेदाराशी प्रत्येक वस्ती, रस्त्यावर, गल्लीबोळात लढण्याशिवाय पर्याय नाही. शत्रूचा नाश करण्याचा उद्देश आपल्या प्रतिकाराची ताकद मोडून काढणे हा आहे, पण आपण आपल्याच भूमीवर पवित्र युद्ध लढत आहोत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम १ डिसेंबर रोजी संपला. या युद्धविराम करारात १०५ ओलीसांची सुटका करण्यात आली. यामध्ये ८० इस्रायली ओलीसांचा समावेश होता. त्याबदल्यात इस्त्रायलने २४० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. इस्रायलने सांगितले की, पॅलेस्टिनी प्रदेशात १३७ कैदी राहिले आहेत. मध्यस्थ कतारने रविवारी सांगितले की नवीन युद्धविराम आणि आणखी ओलीस सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इस्त्रायलचा बॉम्बफेक यशस्वी निकाल देण्याच्या आड येत असल्याचा इशाराही कतारने दिला आहे.
५ हजार रॉकेट डागले
खरं तर, ७ ऑक्टोबर रोजी जेव्हा हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर जमिनीवर हल्ला केला. तेव्हा त्यांनी आकाशातून एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले. या हल्ल्यात एक हजाराहून अधिक इस्रायली ठार झाले तर शेकडो इस्रायली नागरिकांना हमासने ओलीस ठेवले होते. दुसरीकडे, या हल्ल्यानंतर इस्रायलने बॉम्बफेक करून संपूर्ण गाझा पट्टी उद्ध्वस्त केली. पॅलेस्टिनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा बाधित झाल्या. खाद्यपदार्थांपासून ते इंधनापर्यंत सर्वच गोष्टींसाठी आक्रोश होता. लाखो पॅलेस्टिनी बेघर झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे २० हजार लोक मारले गेले आहेत.