मुंबई : रायगडमध्ये शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिस्कटल्यानंतर सिंधुदुर्गमध्येही भाजप-शिवसेना एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचे नाव घेत त्यांच्यामुळे युती होऊ शकली नाही असे म्हटले आहे.
राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढणार नसल्याचे सांगितले. दीपक केसरकर यांनी युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याचे सांगितले. चव्हाण आणि राणे यांचीही भेट झाली होती, असेही ते म्हणाले. उदय सामंत आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यांनी रवींद्र चव्हाण यांना भेटा म्हणून सांगितले.
तिथेही भेट झाल्यानंतर त्यांची(रवींद्र चव्हाण) आणि पालकमंत्र्यांची (नितेश राणे) भेट झालेली होती. त्याच्यामुळे पालकमंत्री बहुदा इच्छुक नसावे, असे वाटते आणि त्याच्यामुळे कदाचित युती होऊ शकली नाही. मला काही पालकमंत्र्यांशी बोलता आलेले नाही. बोलले तर मी आवश्य त्यांच्याशी बोलेन अशी माहिती देत केसरकरांनी युती न होण्याचा ठपका राणेंवर ठेवला.
सिंधुदुर्गात जाऊन उत्तर देईन : राणे
नितेश राणे म्हणाले, याचे उत्तर मी सिंधुदुर्गमध्ये जाऊन देईन. सिंधुदुर्ग पुरता तो विषय आहे. राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. त्यासंबंधी काही भूमिका घ्यायची असेल, तर आमची शेवटी महायुती आहे. आम्ही सगळे मित्रपक्ष आहोत. मित्रपक्ष असल्यामुळे मित्रांशी बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मला नाशिकवरून उत्तर देण्याची गरज नाही अशी भूमिका नितेश राणे यांनी मांडली.

