पॅरिस : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज (दि.8) कूस्तीच्या सेमी फायनलमध्ये 57 किलो वजनी गटात अमन सेहरावतचा दारुण पराभव झाला आहे. जपानच्या रे हिगुची याने अवघ्या 1 मिनिट 14 सेकंदात अमनला 10-0 इतक्या मोठ्या फरकाने चितपट केले. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये अमनने अल्बेनियाच्या जेलिमखान एबकारोवचा 11-0 च्या फरकाने पराभव केला होता.
विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर सर्वांच्या नजरा अमन सेहरावतवर होत्या. त्याने सुरुवातीला क्वार्टर फायनल लढतीत अल्बेनियाच्या पैलवानाला मोठ्या फरकाने अस्मान दाखवले होते. त्याची खेळी पाहून सर्वांनी त्याच्याकडून पदकाची आशा ठेवली होती. पण, सेमी फायनलमध्ये जपानच्या पैलवानाने अमनचा 10-0 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला.
सामन्याची सुरुवात होताच जपानच्या रे हिगुची याने आपली आक्रमक खेळी दाखवली. सुरुवातीच्या काही सेकंदात जपानच्या पैलवानाने 4 गुणांची आघाडी घेतली. यानंतर अमन जोरदार प्रत्युत्तर देईल असे वाटत होते, पण रे हिगुची याने आणखी गुण मिळवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. सामन्याच्या शेवटी अमनवर आपला अखेरचा डाव टाकत जपानच्या पैलवानाने 10 गुणांची आघाडी घेऊन सामना आपल्या नावाव केला.
अमनने हा सामना जिंकला असता, तर तो थेट अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी खेळला असता. पण, या सामन्यातील पराभवामुळे अमन आणि संपूर्ण भारताचे सूवर्णपदकाचे स्वप्न भंगले आहे. आता अमनला आणखी एक संधी मिळणार असून, तो कांस्य पदकासाठी मैदानात उतरले. उद्या म्हणजेच, 9 ऑगस्ट रोजी कांस्य पदकाचा सामना होईल. या सामन्यात तो कांस्य पदक जिंकेल, अशी सर्वांना आशा आहे.