वॉशिंग्टन : इराणने माझी हत्या केली तर त्या देशाचा अमेरिका पूर्ण नायनाट करेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. इराणवर पुन्हा हल्ला झाला तर आमच्याकडे जी काही संसाधने आहेत ती सर्व वापरून आम्ही अतिशय तिखट प्रत्युत्तर देऊ, असा इशारा त्या देशाचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिला. खामेनेई यांच्या सत्तेचा अंत करण्याचा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.
ट्रम्प यांनी मुलाखतीत सांगितले की, माझ्याबाबत काहीही वाईट घडले तर ते कृत्य करणा-यांना अमेरिका या पृथ्वीतलावरून कायमचे नष्ट करून टाकतील. तसे आदेशच मी दिले आहेत. त्यावर इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांनी बुधवारी अमेरिकेला थेट इशारा दिला. त्यांनी सांगितले, जून २०२५ मध्ये झालेल्या हल्ल्याप्रसंगी इराणने संयम दाखविला. पण आता पुन्हा हल्ला झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. खामेनेई यांच्या विरोधात जो कारवाई करायला धजेल, त्याला आम्ही नष्ट करू.
मृतांचा आकडा ४,५१९ वर
अमेरिकास्थित ूमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीनुसार, आंदोलनांमधील मृतांचा आकडा किमान ४,५१९ वर पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी सांगितले की, आंदोलनांमध्ये काही हजार लोकांचा मृत्यू झाला असून, त्याला अमेरिकेला जबाबदार आहे. या आंदोलनात २६,३०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
विमानात बिघाडामुळे ट्रम्प पुन्हा परतले
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे जात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एअर फोर्स वन या विमानामध्ये किरकोळ बिघाड आढळल्याने ते तातडीने वॉशिंग्टनला माघारी आणण्यात आले. त्यानंतर ट्रम्प दुस-या विमानातून दावोसला रवाना झाले. उड्डाणानंतर एअर फोर्स वनच्या कर्मचा-यांना त्यात किरकोळ स्वरूपाचा इलेक्ट्रिकल बिघाड मंगळवारी आढळून आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान अमेरिकेला पुन्हा माघारी नेण्यात आले. व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प आणि त्यांच्यासोबतचे सहकारी दुस-या विमानाने स्वित्झर्लंडला गेले आहेत.

