ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा केली. कंपनी आपल्या प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो कर्मचा-यांना सेवामुक्त करणार आहे. कंपनीचे प्रमुख माईक हॉपकिन्स यांनी बुधवारी कर्मचा-यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली.
हॉपकिन्सने ईमेलमध्ये काय म्हटले?
हॉपकिन्स यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे की, आम्ही काही क्षेत्रात गुंतवणूक कमी किंवा बंद करण्याचा विचार करत आहेत. परिणामी आम्ही प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओमध्ये कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी अॅमेझॉनच्या लाइव्ह गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपनी ट्विचनेही कर्मचारी कपातीची घोषणा केली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी या आठवड्यात आपल्या ३५ टक्के कर्मचारी म्हणजेच सुमारे ५०० कर्मचा-यांना सेवामुक्त करीत आहे.
ट्विचने गेल्या वर्षी अनेक कर्मचा-यांना काढून टाकले आणि वाढत्या खर्चामुळे दक्षिण कोरियामधील व्यवसाय बंद केला. अॅमेझॉनने २०२२ च्या उत्तरार्धात आणि २०२३ च्या सुरुवातीस कर्मचारी कपातीची घोषणा केली होती.
गेल्या वर्षी अमेझॉन.कॉमने त्यांच्या संगीत विभागातील कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले होते. गेल्या वर्षभरात कंपनीतील २७,००० पेक्षाही अधिक कर्मचा-यांच्या नोक-या गेल्या आहेत.