मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली.
दिल्लीतील या बैठकीनंतर सदर नेत्यांमध्ये चंदीगड इथेही एक बैठक पार पडली. मात्र चंदीगडमध्ये अमित शाह यांची राज्यातील तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री नक्की कोणार होणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.
महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढू, मात्र मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय निवडणुकीनंतर आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मांडण्यात येत आहे. अशातच अमित शाह यांनी चंदीगड येथील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १५ ते २० मिनिटे स्वतंत्र चर्चा केल्याने त्यांना नेमके काय आश्वासन दिले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेबाबतही भाजपचे केंद्रीय नेतृत्व समाधानी असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिमेचा अधिकाधिक वापर महायुतीने करून घ्यावा, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.