नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिका-यांची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी झालेल्या या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शाह यांनी १६ जून रोजी नॉर्थ ब्लॉकमध्ये बैठक बोलावण्याचे निर्देश दिले, जिथे अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. यात जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, लष्कर, पोलिस, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि तेथील दहशतवादी घटनांनंतर उचललेल्या पावलांची माहिती देण्यात आली. गेल्या चार दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी चार ठिकाणी हल्ले केले आहेत. ९ यात्रेकरूंशिवाय एका जवानाचा मृत्यू झाला, तर सुरक्षा कर्मचा-यांसह इतर ७ जण जखमी झाले. कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन संशयित पाकिस्तानी दहशतवादीही ठार झाले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमधील जम्मू भागात रात्री घराबाहेर पडणे असुरक्षित असल्याच्या सोशल मीडियावरील वृत्ताचे पोलिसांनी खंडन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, रात्री घराबाहेर पडताना कोणतीही भीती नाही आणि लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, जम्मूमध्ये रात्री फिरण्यासाठी घराबाहेर पडणे टाळण्याबाबत काही सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जात आहे. नागरिकांनी अशा अफवांवर लक्ष देऊ नये.