21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयअमित शहांनी जिल्हाधिका-यांना धमकावले

अमित शहांनी जिल्हाधिका-यांना धमकावले

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी देशात शनिवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पाडले. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान काँग्रेसने मोठा दावा केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप लावले. गृहमंत्री अमित शाह हे जिल्हाधिका-यांना फोन करून धमकावत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. काँग्रेसच्या या आरोपाची आता थेट निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला होता की, गृहमंत्री अमित शाह यांनी मतमोजणीच्या आधी १५० जिल्हाधिका-यांना फोन करुन धमकावले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टद्वारे केलेल्या सार्वजनिक वक्तव्याबाबत वस्तुस्थिती आणि तपशील मागितला आहे. जयराम रमेश यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्यांना याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.

काय म्हणाले होते जयराम रमेश?
गृहमंत्री सकाळपासून जिल्हाधिका-यांशी फोनवर बोलत आहेत. आतापर्यंत १५० अधिका-यांशी चर्चा झाली आहे. अधिका-यांना उघडपणे धमकावण्याचा हा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लक्षात ठेवा लोकशाही धमक्यांवर नव्हे तर आदेशावर चालते. ४ जूनच्या जनादेशानुसार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडतील आणि भारताचा विजय होईल. अधिका-यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता संविधानाचे रक्षण करावे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे असे जयराम रमेश यांनी म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR