हिंगोली : येथील आखाडा बाळापूर कृषी संशोधन व बीजगुणन केंद्राचे प्रमुख कृषी पर्यवेक्षक यांचा कार्यालयातच अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केल्याचे गुरूवार दि. १४ मार्च रोजी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. राजेश शिवाजीराव कोल्हाळ असे मृताचे नाव आहे. छाती, हातावर धारदार शस्त्राचे वार केल्याने कोल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला. कार्यालयातच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
नांदेड-हिंगोली रोडवर आखाडा बाळापूर नजीकच कृषी विभागाचे बीजगुणकेंद्र तथा कृषी संशोधन केंद्र आहे. येथे शेतीवर संशोधन व बीजगुणनाचे काम केले जाते. या ठिकाणी राजेश शिवाजीराव कोल्हाळ (३६, राहणार कोंडवाडा , तालुका सेनगाव) हे बीजगुणन केंद्राचे प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी साडेअकरा वाजता ते कार्यालयात येऊन नियमित कामकाज करत होते. दुपारी कामानिमित्त काही कामगार कार्यालयात आले असता त्यांना कोल्हाळ यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ माजली.
माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात, ठाणेदार सुनील गोपीनवार , पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिक तपास करत असून ठसे आणि श्वान पथकाला पाचरण करण्यात आले आहे.