छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत ती पेटवून दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच अग्निशमक दलाला पाचारण करून पेटवून दिलेल्या बसची आग विजवण्यात आली. शाहरुख पठाण (वय 4 वर्षे) असे मयत मुलाचे नाव आहे. तर, याच अपघातात मुलाची आई देखील जखमी झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाण आपल्या आईचे बोट धरून किराणा दुकानात जात होता. याचवेळी तिथून जाणा-या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली. मात्र, शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित केले.