मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान केल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आणि इतर उपस्थित प्रवाक्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. फक्त पुस्तक फाडण्याच्या निमित्ताने बाळासाहेबांचा फोटो घटनास्थळी का आणला? असा सवालही त्यांनी केला.
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली जात असेल तर बाळासाहेब ठाकरे यांनादेखील महाराष्ट्राने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे, असे म्हणत भाजपवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला.
घडलेल्या घटनेनंतर शायना एनसी यांनी जाहीर माफी मागितली. पण यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘जर तुम्हाला पुस्तक फाडायचे होते किंवा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडायचा होता, तर अय्यर यांचा स्वतंत्र फोटो आणायचा होता. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो प्रत्येकासमोर का ठेवण्यात आला? हा प्रकार अनावधानाने झालेला नसून बाळासाहेबांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठीच तो फोटो आणला गेला होता. असा दावा त्यांनी यावेळी केला.
माफीचा नुसता देखावा
खासदार संजय राऊत म्हणाले की, हे लोकं कालपर्यंत अक चा खोटा फोटो दाखवून ‘आम्ही फाडलेच नाही’ असा दावा करत होते. मात्र, शिवसैनिक आणि मराठी जनतेचा उद्रेक पाहिल्यानंतर प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माफी मागितली. माफी मागणे ही केवळ पळवाट असून राज्यभरात शिवसैनिकांचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे म्हणत टीका केली.
















