22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयसंशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : मतदानाच्या आकडेवारीच्या मुद्यावरून संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्ही याबाबत सर्वांना एक दिवशी सविस्तर सांगू. लोकांची कशी दिशाभूल केली जाते, याचा खुलासा करु, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

राजीव कुमार यांनी सहकुटुंब दिल्लीत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. केंद्र निहाय मतदानाची आकडेवारी तसेच फॉर्म १७ ची माहिती जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात राजीव कुमार प्रथमच बोलले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाने सत्य स्वीकारले आहे. परंतु, संशयाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. याबाबत काय खेळ खेळला जात आहे, संशय का निर्माण केला जात आहे? लोकांची कशी दिशाभूल केली, हे आम्ही सांगू, असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकाची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकांत उत्तम प्रमाणात झालेले मतदान पाहून आनंद झाला आहे. महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. मतदारांनी दाखविलेल्या उत्साह, विश्वासामुळे लोकशाहीची पाळेमुळे आणखी घट्ट रुजण्यास मदत झाली आहे. जनतेला लोकनियुक्त सरकारची आवश्यकता असते. जम्मू-काश्मीरच्या जनतेला ते मिळविण्यास पात्र आहेत. तेथे विधानसभा निवडणुका घेण्यासाठी आम्ही लवकर प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार म्हणाले.

३७० नंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुमारे एक महिनाभर चालते. त्या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामुळे विधानसभेच्या जागांची संख्या ८३ वरून ९० पर्यंत पोहोचली आहे. ३० सप्टेंबरच्या आत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR