22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीवर अनाठायी टीका करण्याचा प्रयत्न :चंद्रकांत पाटील

महायुतीवर अनाठायी टीका करण्याचा प्रयत्न :चंद्रकांत पाटील

पुणे, प्रतिनिधी – आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फारसे यश मिळत नाही असे दिसत असल्याने महायुतीवर अनाठायी टीका करण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत, असे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, शिरूर आणि बारामती या तीन लोकसभा मतदार संघांतील महायुतीच्या सर्व घटक पक्षांची बैठक येथे झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आजच्या दिवसभराच्या बैठकीत निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे मुद्दे, नियोजन, प्रचार दौरा, मतदार संघातील कार्यकर्ता मेळावा आदी बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीत उमेदवार कोण असावा याबाबत काही चर्चा झाली नाही. याबाबत चर्चा नाही तर काहींनी सूचना केल्या आहेत. उमेदवार निवडीसाठी पक्षाचे निरीक्षक येऊन त्यांनी चर्चा केली असून त्यांचा निर्णय पक्षनेतृत्वाला देणार आहेत.

नेते सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांच्या अनुपस्थितीबाबत विचारता ते म्हणाले की, त्यांची काही मते आहेत त्याबाबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. आजच्या बैठकीत घटक पक्षाचे नेते यांनी काही मते मांडली असली तरी समन्वयाच्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईल असे ते म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा.

प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करून माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणे, यावर सर्वांचे एकमत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविण्यात आले. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणा-या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR