पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर साखर कारखाना परिसरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकामूक झालेल्या या वृद्ध दाम्पत्याची तरुणांनी भेट घडवून आणली. त्यानंतर वाहनातून सुखरूप त्यांच्या मूळगावी लोणी येथे पोहोच केले.
लोणी येथील वृद्ध दाम्पत्य वसंत बापू सोनवणे व मालन वसंत सोनवणे हे दोघेजण पंढरपूरवरून आपल्या गावी येत असताना पारगाव येथे त्यांची चुकामूक झाली. येथील माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे व सुरक्षा कर्मचारी गोरक्ष बढे यांना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना बसस्थानक या ठिकाणी बराच वेळ एक वयोवृद्ध बाबाचिंताग्रस्त अवस्थेत बसलेले दिसले. त्यामुळे ढोबळे यांनी विचारपूस केली. त्यांनी त्यांचे नाव वसंत सोनवणे सांगत माझी पत्नी व मी पंढरपूरवरून आलो असून गावी लोणी येथे जायचे आहे.
परंतु पत्नी पुढे गेली की मागे ते माहीत नाही असे सांगितले. ढोबळे यांनी बाबांना तेथेच बसवून कारखाना परिसरात रस्त्याने आजीचा शोध घेतला. भीमाशंकर कारखाना पेट्रोल पंपाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला एक आजी झोपलेल्या आढळून आल्या, त्यांना नाव विचारले असता त्यांनी मालन वसंत सोनवणे असे सांगितले आम्ही पंढरपूरवरून आलो. आमचे मालक वसंत बापू सोनवणे यांची आणि माझी चुकामूक झाल्याचे सांगितले. विठ्ठल ढोबळे, गोरक्ष बढे, दत्तात्रय थोरात यांनी या दाम्पत्याची भेट घडवून आणली. त्याचवेळी तेथून जात असलेल्या वसंत सखाराम तांबे यांच्या कारमध्ये वृद्ध सोनवणे दांपत्याला बसवून त्यांना त्यांच्या मूळगावी लोणी येथे पाठवून देण्यात आले.