28.8 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूची होणार चौकशी करणार

पिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूची होणार चौकशी करणार

नागपूर (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिले. हे प्राणी संग्रहालय महापालिकेकडे न ठेवता वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही महापालिकेला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहाला सुरू करण्याबाबत अश्विनी जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणा-यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या वर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रुग्णालयामार्फत शवविच्छेदन करून सेंट्रल झू प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. त्यांनीदेखील त्यावर कोणताचा आक्षेप घेतलेला नाही; परंतु ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगर विकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल. या मध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्या वर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

या प्राणी संग्रहालयाच्या नूतणीकरण व सुशोभीकरणाचा आराखडा तयार आहे मात्र या मध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने १९ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी या वेळी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR