21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeसंपादकीयअधुरी एक कहाणी!

अधुरी एक कहाणी!

‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’ हे भावगीत ऐकताना मनाला जशा वेदना होतात तशाच वेदना १९ नोव्हेंबर २०२३ रविवार रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सव्वा लाख प्रेक्षकांच्या साक्षीने झाल्या. स्थळ होते एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे! चषक उंचावण्यासाठी भिडंत होती ती यजमान भारत आणि पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाची. चर्चा होती ती निळ्या जर्सीतील भारत तब्बल एक तपानंतर तिस-यांदा तर पिवळ्या जर्सीतील ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा चषक उंचावणार काय याची! संपूर्ण अहमदाबाद शहरावर निळाईचा महासागर पसरला होता.

क्रिकेटला धर्म मानणा-या भारतात गल्ली-बोळांपासून ते गगनचुंबी इमारतीत राहणा-या प्रत्येकाला भारतीय संघ जेता ठरल्यानंतर होणा-या आनंदाचे मोजमाप करणे कल्पनेबाहेरचे होते. वास्तव हे की, २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली जग जिंकल्यानंतर भारताला या झळाळत्या चषकाने अनेक वेळा हुलकावणी दिली होती. त्यामुळे रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत पूर्णत: वर्चस्वपूर्ण कामगिरी कायम राखून एक तपानंतर विश्वविजयाची स्वप्नपूर्ती साकारणार काय याचीच उत्कंठा तमाम दर्दी क्रीडारसिकांना लागून होती. रविवारी विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन सर्वोत्तम संघांमध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित होती. दोन्ही संघांत यापूर्वी विश्वचषक विजयाचा अनुभव असलेले काही खेळाडूसुद्धा होते. मात्र ‘छोडो कल की बातें’ असे म्हणत नवा अध्याय लिहिण्यासाठी दोन्ही संघ आतुर होते. २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने भारताने आयसीसी स्पर्धा जिंकली होती.

ती आतापर्यंत अखेरची ठरली. त्यानंतर दशकापेक्षा अधिक काळ लोटला तरी भारताला आयसीसी स्पर्धेचे जेतेपद मिळविता आलेले नाही. यंदा हा दुष्काळ संपुष्टात येईल, भारत नवा इतिहास रचेल या आशेने देशातील अनेक क्रिकेट रसिक अहमदाबाद नगरीत दाखल झाले होते. क्रिकेट वेड्यांची जत्राच भरली होती. अहमदाबादमधील सारी हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली होती. सामन्याचे तिकिट मिळविण्यासाठी हे रसिक वण वण भटकत होते. काळ्या बाजाराला तर ऊतच आला होता. एकाने तर ब्लॅकमध्ये ५० हजाराला तिकिट खरेदी केले होते म्हणे. तिकिटासाठी क्रिकेट रसिकांची ससेहोलपट का व्हावी याचे उत्तर बीसीसीआयने द्यायला हवे. क्रिकेट कुंभमेळ्याच्या निमित्ताने व्यापारी, दुकानदार, हॉटेलमालक लाभ उठविणार हे उघड होते. यानिमित्ताने सट्टेबाजांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. या सामन्याच्या निमित्ताने सुमारे ७० हजार कोटींचा सट्टा लागला होता म्हणे. चार दशकांपूर्वी कपिल देवच्या संघाने लॉर्डस्वर बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर भारतात क्रिकेटमध्ये क्रांती घडली.

त्यानंतर २०११ ला मुंबईत वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध धोनीने विश्वविजयी षटकार लगावला होता. तो षटकार क्रिकेट रसिकांच्या स्मरणात कायम आहे. त्यानंतर तब्बल एक तपानंतर तसाच पराक्रम करण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मिळाली होती. साखळीतील नऊ सामने दणदणीत रीत्या जिंकून उपान्त्य फेरीत दाखल झालेल्या भारतीय संघाने न्यूझिलंडला खडे चारून रूबाबात अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तुलनेत ऑस्ट्रेलिया संघाने साखळीतील पहिले दोन सामने गमावले होते आणि नंतरच्या काही सामन्यांत केवळ दैवाची साथ मिळाल्यानेच ते विजयी झाले होते. द. आफ्रिकेविरुद्धच्या उपान्त्य सामन्यातही त्यांना रडतपडत विजय मिळाला होता. म्हणजे डळमळीत रीत्याच कांगारू अंतिम सामन्यात दाखल झाले होते. रोहित शर्माच्या संघाचा या वेळचा जोश पाहता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव होणार असेच वाटत होते. वयाची पस्तीशी पार केलेला रोहित कर्णधार म्हणून विश्वविजयाची सुवर्णसंधी सोडणार नाही, असे त्याची देहबोलीच सांगत होती. ‘अभी नही तो कभी नही’ असा निश्चयच त्याने केला होता. इतकेच काय पण भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ‘ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा?’ याची पूर्णपणे जाणीव होती.

त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघ कांगारूंवर तुटून पडेल. असे वाटले होते पण घडले भलतेच! कमिन्सने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. दुसरा कोणी कर्णधार असता तर त्याने एवढ्या मोठ्या पब्लिकसमोर पाठलाग करण्याचे टेन्शन नको म्हणून प्रथम फलंदाजी स्वीकारली असती. दुसरे म्हणजे टॉसचा काही तरी लोच्या दिसतो… नाणे खाली पडल्यानंतर हेड की टेल यावर कॅमेरा का दाखवीत नाहीत? कांगारूंनी भेदक गोलंदाजी आणि लाजवाब क्षेत्ररक्षण केले. आपल्या प्रत्येक फलंदाजाची नाकेबंदी करण्यात त्यांना यश आले. भारताला मोठी धावसंख्या रचता आली नाही. रोहित शर्मा पहिल्या १० षटकांचेच लक्ष्य का ठेवतो? मोठी खेळी करण्याचा प्रयत्न त्याने का केला नाही? भारताने ११ ते ४० या षटकांदरम्यान फक्त दोन चौकार ठोकले. येथेच सामना आपल्या हातातून निसटला. भारताने एकेरी धावांवर समाधान मानले हेच कांगारूंना हवे होते. गिल आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाले तर सूर्यकुमार यादव पूर्णत: फेल गेला. प्रत्येक वेळी कोहली आणि के. एल. राहुल मोठी धावसंख्या कशी काय उभारतील? तरीही दोघांनी अर्धशतके काढलीच. राहुल खूपच संथ खेळला. त्याच्या ६६ धावांत फक्त एक चौकार आहे. भारताने दिलेले २४० धावांचे आव्हान कांगारूंनी ६ गडी आणि ४२ चेंडू शिल्लक ठेवून पार केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू ३ बाद ४७ असे संकटात सापडले होते पण हेड-लबुशेन जोडीने चौथ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हेडने १५ चौकार आणि ४ षटकारांसह शतक (१३७) ठोकले. संपूर्ण स्पर्धेंत वर्चस्व गाजवूनही भारतीय संघाला अंतिम सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघासह १४० कोटी देशवासीयांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी, फिरकीपटूंचे अपयश आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण याचा फटका बसला. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सव्वा लाख प्रेक्षकांचा दबाव कसा सहन करणार, असा प्रश्न ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सला करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कमिन्स म्हणाला होता, सव्वा लाख प्रेक्षकांना कसे शांत करायचे ते आम्हाला चांगले माहीत आहे. कमिन्सने आपले शब्द खरे करून दाखविले. अंतिम सामन्याची प्रसार माध्यमांनी आणि बीसीसीआयने जी जाहिरातबाजी केली ती आपल्याला भोवली, असे म्हणावे लागेल. गर्वाचे घर नेहमीच खाली होत असते. दैवाचा हा खेळ आहे. राजाचा रंक होण्यास दैवगतीचा एक चेंडूही पुरेसा ठरतो! एक कहाणी अधुरी राहिली एवढे मात्र खरे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR