मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड करण्यात आली आहे. परांजपे यांना आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले. दरम्यान, येत्या १८ ते १९ जानेवारीला शिर्डीमध्ये पक्षाचे शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे शिबिर होणार होते. मात्र, शिबिरीचे ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
सभासद नोंदणी हा महत्त्वाचा भाग असणार आहे. सभासद नोंदणीचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे. विविध जिल्ह्यात शहरांमध्येसुद्धा सभासद नोंदणी व्हावी, यासाठी नेमणूक केली जाणार आहे. वेगवेगळे राष्ट्रीय विश्लेषकांना निमंत्रण देणार आहे. पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून तयारी केली जाणार असल्याचे तटकरे म्हणाले.