छ. संभाजीनगर : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या ३९ दिवसांपासून संप सुरू केला आहे. या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी २४ तासांच्या आत कामावर रुजू न झाल्यास सेवेतून कमी करण्याची नोटीस देणा-या प्रशासनाचा निषेध आंदोलन आज (दि. ११) पंचायत समिती परिसरात केले. १६ जानेवारीपासून कार्यालयात बसून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या ३९ दिवसांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू असल्याने सेवेतून कमी करण्याच्या व कारणे दाखवा नोटीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे संपात सहभाग झालेल्या अंगणवाडी कर्मचारी युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेकायदेशीर नोटीस देणा-या एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज पंचायत समितीच्या परिसरात ३०० हून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी निषेध केला.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत व लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत अंगणवाडीवर रुजू होणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाहीर केली. तसेच १६ जानेवारी रोजी कार्यालयात बसून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी वने यांना दिले आहे.