परभणी/प्रतिनिधी
गेल्या चाळीस वर्षापासून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करत असलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांना मानधन वाढीसह शासकीस कर्मचा-यांचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मंगळवार, दि.५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील अंगणवाडी कर्मचारी गेल्या चाळीस वर्षापासून शासनाच्या पल्स पोलिओ मोहिमेसह शासनाच्या विविध योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या संदर्भात मोर्चेक-यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले. त्यात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविका ह्या गरोदर मातांपासून ते लहान बालकांवरील संस्कारासह शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मनोभावे करत असतात. मात्र अंगणवाडी कर्मचा-यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून हे कर्मचारी अशा महागाईच्या काळातही अत्यंत तुटपुंज्या मानधनावर तारेवरची कसरत करत आपली उपजीवीका भागवत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचा-यांना ग्रॅच्युईटी लागू करावी, शासकीय कर्मचा-यांचा दर्जा द्यावा, जोपर्यंत शासकीय कर्मचा-यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन द्यावे, मदतनिसांना २० हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे, सेवानिवृत्त झाल्यानंतर निर्वाह भत्ता (पेन्शन) अंगणवाडी कर्मचा-यांना त्वरीत लागू करावा, आहाराच्या दरामध्ये वाढ करावी, जिल्हयाला असलेल्या सर्व थकबाकी टी.ए. बिल, इंधन बिल, सीबीई, स्टेशनरी, गणवेश, सिमकार्ड रिचार्ज, फेल मध्ये गेलेल्या मानधनाचे पैसे त्वरीत द्यावे यासह इतर मांगण्यां करण्यात आल्या आहेत.
शहरातील जिंतूर रोडवरील जुनी जिल्हा परिषद इमारत जवळ जिल्हयातील सर्व तालुक्यांतील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका एकत्र जमल्या होत्या. तेथून हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपर्यंत काढण्यात आला. अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, परभणी जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष आशा राठोड, इंदुमती तारे, गंगुबाई गिरी, विमल रोडगे, सविता पंचागे, संजीवनी लोलगे, छगुताई काळे, सुनिता कानडे, छाया सासनिक, संगीता नामपल्ले आदींनी आंदोलनाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.