सोलापूर : स्तनदा माता, गर्भवती स्त्रीयांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक दोन महिन्याचा आहार घरपोच दिला जातो. कुपोषणवाढू नये जन्मलेल्या मुलाचे सुरवातीच्या सहा महिन्यात चांगले संगोपन व्हावे, हा त्यामागील हेतू आहे. मात्र, ३ डिसेंबरपासून अंगणवाड्यांना टाळे असल्याने ना स्तनदा माता ना गर्भवती स्त्रीयांना जानेवारी महिन्याचा आहार मिळाला.
अशा अवघड परिस्थितीत त्या महिलांना स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मीळेल ते काम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. राज्यातील एक लाख दहा हजारअंगणवाड्याअंतर्गत २५ लाखांहून अधिक चिमुकल्यांना (सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत) देखील घरपोच पोषण आहार दिला जातो. त्याचबरोबर हातावर पोट असलेल्या कुटुंबातील स्तनदा माता व गर्भवती महिलांनाही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने घरपोच आहार पुरविला जातो.
आता जानेवारी महिन्याचा आहार डिसेंबरअखेर जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये दाखल झाला आहे. मात्र, अंगणवाड्या कुलूपबंद असल्याने ते धान्य गोदामांमध्ये पडून आहे. जानेवारी संपत आला, तरीदेखील त्या महिलांना या महिन्याचा पोषण आहार मिळालेला नाही, अशी चिंताजनक स्थिती आहे. अंगणवाडी कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. दुसरीकडे सरकारकडूनही तोडगा काढलाजात नाही.
यामध्ये स्तनदा माता, गर्भवती महिला, सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची चिमुकली व ३ ते ६ वर्षांपर्यंतच्या बालकांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील हजार- अकराशे अंगणवाड्या उघडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. ज्या लाभार्थीना आहार मिळाला नाही, त्यांना संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळेत आहार मिळावा, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.
माता व बालमृत्यू वाढण्याची भीती महाराष्ट्रात माता व शिशूच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून ते कमी करण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हातावर पोट असलेल्या कुटुंबातील स्तन्यदा मातांसह गर्भवती महिलांना अंगणवाड्यांच्या मदतीने दरमहा पौष्टिक आहार घरपोच दिला जातो. पण, मागील २३ दिवसांपासून त्या महिलांना आहार मिळाला नसल्याने अनेकांची उपासमार होत असल्याचे बोलले जात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात माता व बालमृत्यू वाढू शकतात, अशी भीती वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे.