32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeसोलापूरपशुसंवर्धन विभागाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

पशुसंवर्धन विभागाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

सोलापूर :पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सोलापूर यांच्या मार्फत केंद्र सरकार पुरस्कृत ॲस्कॅड योजनेअंतर्गत प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना अनेक योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन केले गेले. केंद्र पुरस्कृत पशूस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अंगतर्गत गंभीर स्वरुपाचे पशुरोग नियंत्रण, पशू वैद्यकीय संस्थांचे बांधकाम आणि बळकटीकरण या योजनेच्या अंतर्गत फिरत्या पशू चिकित्सा पथकाची स्थापना करणे हा मूळ उद्येश ॲस्कॅड योजनेचा आहे.

यामधील मुख्य भारत पशुधन ऍप, राष्ट्रीय गोकूळ मिशन (आरजीएम), राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम), स्मार्ट योजना या योजनांची सखोल माहिती देण्यात आली. राष्ट्रीय गोकूळ मिशन या योजनेतून देशी गोवंशाच्या वंशावळी विकसित करण्यासाठी मोठ्या स्वरूपात अनुदान दिले जाते. ही योजना ४ कोटी रुपयांची आहे. यात ५०% अनुदान दिले जाते. तसेच याबरोबर राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेच्या अंतर्गत १० लाख ते ५० लाख पर्यंत कुकुटपालन, शेळी पालन, डुक्कर पालन, चारा बनविणे यासाठी अनुदान दिले जाते. तसेच स्मार्ट योजनेच्या मार्फत ६० टक्क्यापर्यंत कुकुटपालन आणि शेळी पालनसाठी अनुदान दिले जाते.

या योजनांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊन व्यवसाय उभारणीसाठी हातभार लागतोय. डॉ. भास्कर पराडे, सहाय्य्क आयुक्त पशुसंवर्धन,जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सलय सोलापूर यांनी गाय व म्हशी मधील ब्रूसलोसिस, लालखूरकत रोगाचे लसीकरण, तसेच शेळ्या मेंढया मधील पीपीआर या रोगाचे लसीकरण आणि सदर लसीकरणातील रक्तजल नमुने घेणे इ. विषयावरती सखोल मार्गदर्शन केले.

पुणे विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, डॉ. संतोष पंचपोर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, डॉ. राजू कोलते, सोलापूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. समीर बोरकर, डॉ. नवनाथ नरळे, डॉ.मंगेश पाटील, डॉ.शरद लोंढे, डॉ.भास्कर पराडे या मान्यवरांनी पशुवैद्यांना लसीकरण आणि वेग-वेगळ्या आजारांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. धनाजी गिड्डे (पशुधन विकास अधिकारी), जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR