20.5 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeमहाराष्ट्रपार्थ प्रकरणावरून अण्णा हजारे कडाडले

पार्थ प्रकरणावरून अण्णा हजारे कडाडले

एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

राळेगण सिद्धी : पुण्यातील कोरेगावमधील ४० एकर जमिनीच्या खरेदीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजिव पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. तब्बल १८०४ कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ ३०० कोटी खरेदी झाल्याचा समोर आले आहे. याच मुद्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे. त्यासाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात.

एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी पवार कुटुंबावर केला. त्याचवेळी राळेगण सिद्धी किती मोठे गाव आहे, पण कधीही गडबड नाही. गोंधळ नाही, असेही हजारे म्हणाले.

दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष धोरणे आखून अवलंब केला पाहिजे. अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणार भाष्य केले.

पार्थ पवार यांच्या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. पण असले प्रकार केवळ कारवाई थांबणार नाही. अशा प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष धोरणे आखून त्याचा अवलंब केला पाहिजे. या प्रकरणाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. असे वागणा-या लोकांना कडक शासन केले पाहिजे, असेही अण्णा हजारे म्हणाले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमिनीच्या व्यवहारावरुन पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यांच्यामुळे अजित पवारही अडचणीत आले आहेत.

पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या १ लाखांचे भाग भांडवल असलेल्या अमेडिया या कंपनीने तब्बल १८०४ कोटी रूपये किंमत असलेली जमीन, अवघ्या ३०० कोटींत खरेदी केली आहे. जी जमीन अमेडियाने खरेदी केली, ती महार वतनाची आहे. वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. तरीही हा व्यवहार झाल्याने बड्या व्यक्तीनेच सूत्रे हलविल्याचा संशय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR