नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या मुद्याला उत्तर दिले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नाना पटोले यांनी मांडला होता.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरील विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. यात उद्योगधंदे, ग्रामीण विकास, मराठवाडा, विदर्भाच्या विकासाचा मुद्दा, पाणी समस्या यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची भूमिका मांडली.
नाना पटोले काय म्हणाले?
आपण(देवेंद्र फडणवीस)जाहीरनाम्यामध्ये आणि भाषणांमध्ये शेतकरी कर्जमाफी घोषणा केली होती. मला अपेक्षित आहे की, याच सभागृहात आपण सरसकट कर्जमाफी करून मार्चपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करावी, अशी अपेक्षा मी बाळगतो असे नाना पटोले विधानसभेत बोलताना म्हणाले.
कर्जमाफी करणार : मुख्यमंत्री
याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितले आहे, ते पूर्ण करू. निश्चितपणे पूर्ण करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितले आहे, ते ते आम्ही पूर्ण करू. कर्जमाफीही त्यात आहे असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपने जाहीरनाम्यात काय दिले होते आश्वासन?
विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. शेतक-यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजारांऐवजी १५ हजार रुपये देणार. त्याचबरोबर हमीभावाशी समन्वय साधून २० टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबवण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहेत.