नागपूर : जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात दिलासा देणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत होता. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील भर पडली. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावासने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापूस, भात यांसारख्या अनेक पिकांना फटका बसला. दरम्यान, राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी करणार आहेत. या संबधित घोषणा ही शुक्रवारी करण्यात येणार होती. पण पंचनामे पूर्ण न झाल्याने सोमवारी घोषणा केली जाणार आहे.
अवकाळी पावसावर मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत सर्व पंचनामे पूर्ण न झाल्याने पॅकेजची घोषणा कशी करायची हा सरकारपुढे मोठा पेच आहे. त्यामुळे यासंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. नुकसान झाल्यानांतरही विमा कंपनींकडून देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. याबाबतीतही राज्य सरकार काही भूमिका घेण्याची शक्यता आहे.
नागपुरात सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली. अवकाळीग्रस्तांना सरकारने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत १ हजार २२८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तरीही अनेक तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही, असे देखील विरोधकांचे म्हणणे आहे.