पुणे : राज्यभरातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षांसाठी शिक्षण विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यावर्षीच्या परीक्षा २५ एप्रिल पर्यंत चालणार असल्याने पालक व शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.
दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक शाळा परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये होत असतात. १५ एप्रिल पर्यंत परीक्षांचे कामकाज पूर्ण होऊन पुढील पंधरवड्यात वार्षिक निकाल पत्रिक तयार करून १ मे ला निकाल जाहीर केला जातो. मात्र या वर्षाच्या उशिरा होणा-या परीक्षेमुळे शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
राज्याध्यक्ष मारणे म्हणाले, राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षांमध्ये एक वाक्यता राहावी. तसेच एप्रिलमध्ये मुलांची उपस्थिती राहण्यासाठी वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. एप्रिल अखेरपर्यंत हे परीक्षा सुरू राहणार असल्याने या वेळापत्रकावर पालक व शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. वार्षिक परीक्षेसोबतच, संकलित मूल्यमापन २, पॅट चाचणीचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत. ही परीक्षा ३ री ते ९ वीच्या वर्गासाठी आहे. पॅट परीक्षा मराठी, इंग्रजी व गणित या विषयासाठी घेतली जाते. त्याचबरोबर पाचवी ते आठवी या मुलांसाठी वार्षिक परीक्षा घेण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्तालयाच्या परिपत्रकातील वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पाडल्यास शेवटचा पेपर २५ एप्रिल रोजी आहे. त्यानंतर निकालापर्यंत फक्त चार ते पाच दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. जास्त विद्यार्थी संख्या असणा-या शाळांमध्ये निकालाच्या कामासाठी खूप कमी कालावधी मिळत आहे.
१ मे रोजी निकाल कसा जाहीर करणार?
अशा परिस्थितीत १ मे रोजी निकाल कसा जाहीर करणार असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. ऐन उन्हाळ्यात मुलांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. १५ एप्रिल नंतरचा प्रचंड उकाडा, बाहेरगावी जाणारे पालक, ग्रामीण भागातील यात्रांचा हंगाम यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यासाठी शिक्षकांची धावाधाव होणार असून अनेक मुले उष्णतेमुळे आजारी पडण्याच्या भीतीने पालकांनी या अघोरी शिक्षणावर संताप व्यक्त केला आहे.
परीक्षेनंतर शिक्षकांची कामे
वार्षिक परिक्षेनंतर शिक्षकांना पेपर तपासणी, संकलित मूल्यमापन नोंदवही पूर्ण करणे, पॅट परीक्षेचे गुण ऑनलाइन चॅटबोटवर भरणे, निकाल पत्रकांना मंजुरी घेणे यासारखी कामे करावी लागतात.
शिक्षण विभागाचा अवेळी निर्णय
फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ देण्याऐवजी त्यांना महिनाभर प्रशिक्षण देणे आणि ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात विद्यार्थी शिक्षकांना नियमित शिक्षणासाठी आग्रह करणे अजब असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी म्हटले आहे.