26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रआणखी १६ लाख बहिणींच्या खात्यात ३००० रुपये आले

आणखी १६ लाख बहिणींच्या खात्यात ३००० रुपये आले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्याता पैसे जमा केले जात आहेत. आतापर्यंत ८० लाख महिलांच्या बँक खात्यावर राज्य सरकारने ३००० रुपये पाठवले आहेत. असे असतानाच सरकारने आणखी १६ लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी दिला आहे. तशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात ३००० रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते. सद्यस्थितीत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस १४ ऑगस्ट रोजी ३२ लाख महिलांना तर १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वत: लक्ष ठेवून आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते. ३१ जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR