सोलापूर : एकाकडून फ्लॅटचे १० लाख रुपये घेऊन पैसे घेऊन तो फ्लॅट परस्परच दुस-याला विकून फसवणुक करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पनाश अपार्टमेंटच्या थेपडें बिल्डरसह दोघांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेपर्डेंंविरुध्द गेल्या दोन दिवसांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत राहुल मारूती सर्वगोड (वय ४४, रा. घर नं. ई ३, मोदी, हुडको, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पनाश लाईफ स्टाईल होम्सचे ओनर अमित थेपडे (रा. पुणे), सेल्स मॅनेजर जावेद शेख (रा. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२२ मध्ये पनाश लाईफ स्टाईल होम्सचे ओनर अमित थेपडे यांच्या पनाश अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. १३०२ यासाठी राहुल सर्वगोड यांच्याकडून जनता सहकारी बँक, शाखा सदर बझार येथील सर्वगोड यांच्या खात्याचा २ लाख रुपये रकमेचा चेक घेतला होता. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत थेपडे याने सर्वगोड यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण १० लाख रूपये स्विकारले.
पैसे स्विकारूनदेखील थेपर्डे याने सर्वगोड यांना फ्लॅट नं. १३०२ हा न देता सर्वगोड यांच्या परस्पर ११
ऑक्टोबर २०२२ रोजी विशाल जाधव व ललिता जाधव यांना साठेखत दस्त क्र. ५०२४/२०२२ नुसार विक्रि करून सर्वगोड यांची फसवणुक केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राहुल सर्वगोड यांनी २ सप्टेंबर २०२४ रोजी थेपडे हा विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथील कार्यालयात असताना त्यास भेटून, मी तुम्हांला १० लाख रुपये दिले आहे, परंतु तुम्ही आजतागायत मला फ्लॅट दिला नाही असे म्हणाल्यानंतर थेपडे व त्याचा सेल्स मॅनेजर जावेद शेख या दोघांनी सर्वगोड यांना जातीवाचक बोलून कार्यालयातून बाहेर काढले.
तुझा फ्लॅट आम्ही दुस-यास विक्रि केलेला आहे, तुला आता आम्ही फ्लॅट देवू शकत नाही, आम्ही खालच्या जातीच्या लोकांना फ्लॅट विक्री करत नाही, तुझे पैसे बुडाले असे समज, यापुढे येथे आलास तर याद राख असे म्हणून सर्वगोड यांना जातीवाचक बोलून अपमानित करून कार्यालयातून बाहेर काढले. त्यामुळे सर्वगोड यांनी याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलिस आयुक्त यशवंत गवारी पुढील तपास करीत आहेत.