28.3 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeमहाराष्ट्रअंतरवाली ते मुंबई पायी दिंडीचा मार्ग ठरला

अंतरवाली ते मुंबई पायी दिंडीचा मार्ग ठरला

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. २० जानेवारीला आंतरवाली सराटीमधून सकाळी ९ वाजता पायी दिंडी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तर, अंतरवाली सराटी-अहमदनगर-पुणेमार्गे मुंबईला ही पायी दिंडी पोहोचणार आहे.

मनोज जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना, शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे अशी दिंडी पोहोचेल. त्यानंतर पुढे पुणे, मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहोचणार आहे. दिंडीच्या आसपासच्या गावातील लोक त्या-त्या ठिकाणी दिंडीत सहभागी होतील. सगळ्या नियोजनाचे पीडीएफ तयार करून कार्यकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवण्यात येणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.

दरम्यान याचवेळी मनोज जरांगे यांनी काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. ज्यात, ‘शांततेत दिंडी असेल, फोटो काढण्यासाठी गर्दी करू नका, ज्या तुकडीत तुम्हाला दिले आहे त्याच तुकडीत राहा, आपल्या प्रत्येक गाडीत दोन समन्वयक ठेवावे. तसेच, मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की, गट-तट करू नका,’ असेही जरांगे म्हणाले आहेत.

वेगवेगळ्या तुकड्या केल्या जाणार…
दिंडी ज्या गावातून जाणार आहे त्या गावाच्या परिसरातील नागरिकांनी त्याच गावाच्या ठिकाणी जमा व्हावे. तेथून पुढे एकत्र प्रवास करावा. तसेच, ज्या गावातून लोक मुंबईला जात आहेत, त्या गावातील लोकांनी मुंबईला जाणा-या सर्व लोकांना रस्त्यात लागणा-या खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी. गावक-यांनी एकत्र येऊन त्यांना होईल तेवढी मदत करावी, असे अवाहन जरांगे यांनी केले आहे. सोबतच मुंबईला जाण्यासाठी तुकड्या केल्या जाणार असून, प्रत्येक तुकडीतल्या लोकांनी आपापली जेवण-खाण्याची सोय करावी. जे वाहन सोबत असणार आहे त्याला घरासारखे बनवावे. तसेच, आपापल्या तुकडीत कोण आहे त्यावर लक्ष ठेवा. कोण वेडंवाकडं शिरतंय का त्यावर लक्ष द्या, दिंडीत कोणीही व्यसन करणार नाही यावर लक्ष ठेवा असेही जरांगे म्हणाले.

जीवनावश्यक वस्तू सोबत घेणार
तर, शेतक-यापासून श्रीमंत मराठ्यापर्यंत सर्वांनी या दिंडीत सामील व्हावे असे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. अजून या यात्रेला नाव देणे बाकी आहे. तर, अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ सोबत घ्यावे. टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, तवा, पातेले सर्वकाही सोबत घेऊन चला, ऊसतोड करायला चाललो समजून सर्व संसार सोबत घ्या, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR