नवी दिल्ली : पाकिस्तानमधून भारतीय सीमेवर पाठवण्यात येणाऱ्या ड्रोनचा खेळ लवकरच संपणार आहे. या ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे आणि ड्रग्ज भारतीय सीमेत पाठवण्यात येते. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यात आले आहे. तीन प्रकारच्या उपकरणांची सध्या चाचणी सुरू असून यातील एक किंवा दोन तंत्रज्ञान सीमेच्या प्रत्येक भागात तैनात केले जाणार आहेत. ड्रोनविरोधी तंत्रज्ञान कार्यान्वित होण्यासाठी केवळ १८० दिवस लागणार आहेत. म्हणजेच सहा महिन्यांनंतर पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनचा प्रवेश पूर्णपणे बंद होणार आहे.
पाकिस्तानचे ड्रोन कितीही उंचीवर असले तरी ते भारतीय हद्दीत घुसू शकणार नाहीत. विशेष म्हणजे या तंत्रात सीमा रक्षक दलाला गोळीबार करावा लागणार नाही. तांत्रिक यंत्रणा पाकिस्तानच्या ड्रोनला तिथेच ठप्प करेल. पंजाब आणि जम्मू-काश्मीरसह अन्य सीमाभागातून येणाऱ्या ड्रोनला ठप्प करण्यासाठी तांत्रिक यंत्रणेची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. बीएसएफकडून पाकिस्तान आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाळत ठेवण्यासाठी ‘सीआयबीएमएस’ची चाचणी घेतली जात आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’कडून सातत्याने पंजाबमध्ये ड्रोन पाठवले जात आहेत. जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्येही अशी प्रकरणे समोर आली आहेत. ड्रोनद्वारे शस्त्रे, काडतुसे आणि ड्रग्जची पाकिटे टाकली जातात. गेल्या वर्षीच बीएसएफने सीमेवर सुमारे १०० पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोनद्वारे पाठवल्या जाणार्या ड्रग्जची पाकिटे दररोज जप्त केली जात आहेत.