बंगळूरू : कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २००० रुपये देणार अशी घोषणा काँग्रेसने केली होती. पण, कर्नाटकमध्ये महिलांना फसवून त्यांचा अपमान केला, असा आरोप भाजपने केला. भाजपने केलेल्या या आरोपावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांनी संताप व्यक्त केला. महायुतीच्या नेत्यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला.
खटाखट खोटे आश्वासन देणा-यापासून सावधान. महिलांच्या हक्कांवर दरोडा, काँग्रेसचा हाच खरा चेहरा अशी जाहिरात भाजपकडून करण्यात आली. भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांना आता शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे की कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहका-यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल करण्यापर्यंत ते गेले आहेत.
ही बसवण्णांची भूमी आहे. आम्ही आमच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. याबाबत कोणालाही शंका असेल, तर मी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करीन, जेणेकरून ते कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधू शकतील आणि सत्य जाणून घेऊ शकतील असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. आमच्या १.२२ कोटी महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १.६४ कोटी कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. ४.०८ कोटी लोकांना ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत मोफत तांदूळ दिले जात आहे. ‘शक्ती’ योजनेद्वारे ३२० कोटी महिलांनी मोफत प्रवास केला आहे. ‘युवा निधी’ योजनेद्वारे ५ लाख विद्यार्थ्यांना महिन्याला ३००० रुपये मिळत आहेत असे उत्तर त्यांनी भाजपच्या आरोपांना दिले आहे.
जनतेची दिशाभूल करू नये
दिशाभूल करणा-या माहितीमुळे जनतेची फसवणूक करणा-या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. अन्यथा, आम्हाला कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल असा इशारा शिवकुमार यांनी दिला आहे.