अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागच्या निवडणुकीत पराभूत करून अमेरिकी मतदारांनी त्यांच्या चौखूर उधळलेल्या वळूला वेसण घातली होती. मात्र, निर्णय आपल्या विरोधात गेला की, व्यवस्थेच्या निष्पक्षतेवरच शंका घेऊन पराभवास नाकारायचे, हाच ‘ट्रेंड’ सध्या जगभरातील राजकीय क्षेत्रात रुजला आहे. डोनाल्ड ट्रम्प तर या ‘ट्रेंड’चे आद्यप्रवर्तकच! त्यामुळे त्यांनी आपला पराभव मान्य करणे अपेक्षितच नव्हते. मात्र, त्यांनी पराभवावर केवळ थयथयाट न करता ‘मतदान नव्हे दरोडा’ असे जाहीर वक्तव्य करत आपल्या समर्थकांना सरळसरळ चिथावणीच दिली. त्यातूनच वॉशिंग्टनमध्ये कॅपिटॉल इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी थेट हल्लाच चढविण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. त्यावेळी कॅपिटॉलमध्ये सत्ताबदलास अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होती. या गोंधळाने अमेरिकेच्या आदर्श मानल्या जाणा-या संस्कृतीची जगासमोर अक्षरश: लाज निघाली. मात्र, स्वत: ट्रम्प यांना आपल्या कृतीची वा वक्तव्याची तसूभरही लाज वाटली नाहीच. उलट अत्यंत निर्लज्जपणे त्यांनी हल्लेखोरांना समर्थन दिले. ‘शाब्बास रे माझ्या बहाद्दरांनो, मला तुमचा अभिमान वाटतो,’ असे जाहीर वक्तव्य या ट्रम्प महाशयांनी केले होते. त्याचवेळी त्यांची लोकशाही व्यवस्थेबाबतची आस्था व विश्वास तर स्पष्ट झालाच होता पण ते किती अविचारी आणि उद्दाम आहेत हे स्पष्ट झाले होते. आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलो आहोत, मग व्यवस्था आपले काय वाकडे करणार, हा त्यांच्यात ठासून भरलेला ‘मद’ स्पष्ट झाला होता.
याच प्रकरणी आता कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने ४ विरुद्ध ३ अशा मताधिक्याने डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरविले आहे व त्यांना भविष्यात कोणतेही सरकारी पद भूषविण्यास अपात्र ठरविले आहे. अमेरिकी संविधानातील चौदाव्या घटना दुरुस्तीच्या अनुच्छेद-३ चा आधार घेऊन सर्वाेच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या अनुच्छेद-३ नुसार संविधान, सरकार व सरकारी आस्थापनांना पाठबळ देण्याची शपथ घेऊन पद उपभोगल्यानंतर त्याच व्यवस्थेच्या विरोधात उठाव करणे, उठावास चिथावणी देणे वा उठावास समर्थन देणे ही बाब कायदेबा आहे. अशी व्यक्ती कुठलेही सरकारी वा संविधानिक पद भूषविण्यास अपात्रच ठरते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना याच राज्यातील खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल रद्द ठरवला. त्या न्यायालयाने ‘अनुच्छेद मसुद्यात अध्यक्ष असा थेट उल्लेख नाही,’ असा दावा करत ट्रम्प यांना संशयाचा फायदा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार चपराक बसली आहे. अर्थात कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास फेडरल सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभा ट्रम्प यांना आहेच.
त्यामुळे दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली दावेदारी प्रबळ करण्याच्या प्रयत्नात असणारे ट्रम्प या निर्णयास नक्कीच आव्हान देणार हे उघड आहे. कदाचित तेथे त्यांच्या बाजूनेही निकाल लागू शकतो. कारण या फेडरल न्यायालयातील तीन न्यायाधीशांची नेमणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात केलेली आहे व न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये रिपब्लिकन नियुक्त न्यायाधीशांची संख्या जास्त आहे. अमेरिकेत न्यायाधीशांच्या नियुक्त्या राजकीय असतात. प्रबळ लोकशाही देशात न्यायाधीशांच्या नियुक्त्या राजकीय असणे ही खरे तर मोठी त्रुटीच! मात्र, आजवरच्या अमेरिकी सत्ताधा-यांना ही त्रुटी दूर करण्याची गरज वाटलेली नाही. त्यामागे दोन्ही पक्षांचा राजकीय स्वार्थच कारणीभूत आहे हे स्पष्टच! मात्र, या सगळ्यातून न्यायसंस्थेच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते व ट्रम्प यांच्यासारखे लोक व्यवस्थेतील अशा त्रुटींचा बरोबर फायदा उचलतात हे दुर्दैवच! सध्याही ट्रम्प हेच करत आहेत. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षितच होता असाच प्रचार स्वत: ट्रम्प व त्यांचे समर्थक करत आहेत. कारण कोलोरॅडो न्यायालयात डेमोक्रॅटिक नियुक्त न्यायाधीशांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे या निर्णयाच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे व दुर्दैवाने या प्रयत्नास यशही येत असल्याचे अमेरिकेत पाहावयास मिळते आहे. ट्रम्प यांच्याबाबत आलेल्या या निकालावर अमेरिकेत दुफळी पाहायला मिळते आहे व त्यातूनच फेडरल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने येईल असा दावा केला जातो आहे. कदाचित हा दावा खराही ठरू शकतो व आज निवडणूक रिंगणाबाहेर गेलेले ट्रम्प पुन्हा रिंगणात येऊ शकतात. तसेही ट्रम्प मागच्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी रिपब्लिकन पक्षात येत्या निवडणुकीसाठी तेच सर्वांत प्रबळ उमेदवार आहेत व त्यांनी तसा दावा ठोकून निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांची लोकप्रियता घटली आहे आणि ट्रम्प यांची लोकप्रियता वाढते आहे. बायडेन यांच्या कारभारावर अमेरिकी जनता समाधानी नाही, हेच यातून दिसते. बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षातील त्यांचे सहकारीही त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत. जगात सुरू असलेली सध्याची दोन्ही युद्धे बायडेन यांना थांबविता आलेली नाहीत. त्यामुळे अमेरिकी नागरिकांबरोबरच जगाच्या अनेक देशांतील नागरिक बायडेन यांच्याबाबत निराशा व्यक्त करीत आहेत. त्याचा फायदा ट्रम्प यांनी उचलला आहे व बायडेन यांच्यावर अत्यंत तिखट हल्ले सुरू केले आहेत.
ट्रम्प यांच्या या प्रचाराचा मुकाबला जनतेत जाऊन करण्याचा उत्साह डेमोक्रॅट पक्षाने दाखवायला हवा. मात्र, तसे करण्याऐवजी ट्रम्प निवडणूक लढण्यास कसे अपात्र आहेत, हेच सिद्ध करण्यावर जास्त भर दिला जातो आहे. त्यातून अमेरिकी नागरिकांमध्येच दुफळी निर्माण होते आहे व ट्रम्प यांना हे हवेच असल्याने स्थलांतरित नागरिकांविरुद्धचा आपला प्रचार तीव्र करून ट्रम्प ही दुफळी जास्तीत जास्त कशी वाढेल याचाच प्रयत्न करत आहेत. देशात अशीच दुफळी निर्माण झाल्यानेच कॅपिटॉलवर हल्ल्याची लाजीरवाणी घटना घडली होती हे डेमोक्रॅटिक पक्षाने विसरता कामा नये. मात्र, हे वास्तव जनतेत जाऊन सांगण्याचा उत्साह ना बायडेन दाखवतायत ना त्यांचा पक्ष. त्यांचा सगळा भर ट्रम्प निवडणूक लढण्यास अपात्र ठरून निवडणूक रिंगणातून परस्पर बाद कसे होतील यावरच दिसतो आहे. धूर्त ट्रम्प यांनी हे बरोबरच ओळखून न्यायालयाने त्यांना चपराक लगावली असली तरी त्याचा वापर आपल्या प्रचारासाठी करून न्यायालयाच्या निष्पक्षतेवरच संशय निर्माण केला आहे. अत्यंत प्रगल्भ मानल्या जाणा-या अमेरिकी लोकशाही व्यवस्थेत ट्रम्प यात यशस्वी ठरतात, हे देशाचे व जगाचेही दुर्दैवच म्हणावे लागेल!