22.2 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeसोलापूरशासनाप्रमाणे महापालिका कर्मचा-यांना महागाई भत्ता लागू करा

शासनाप्रमाणे महापालिका कर्मचा-यांना महागाई भत्ता लागू करा

सोलापूर : प्रतिनिधी
शासनाप्रमाणे महापालिका कर्मचा-यांना ५० टक्के महागाई भत्ता लागू करावा, यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली. स्वातंत्र्यदिनी याबाबत घोषणा करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला.

महापालिकेतील सेवकांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे वेतन, भत्ते, इतर सुविधा देण्याबाबत महाराष्ट्र शासन, महापालिका यांचा उच्च न्यायालयात १९७७ चा करार झाला आहे. मात्र अनेक देणी प्रलंबित आहेत. नियमाप्रमाणे महापालिका सेवकांची विविध फरकाची सुमारे ३०० कोटीहून अधिकची बाकी आहे. ती रक्कम समान हफ्त्यात मिळावी, महाराष्ट्र शासनाकडे ५० टक्के महागाई भत्ता असताना येथील सेवकांना केवळ २५टक्के महागाई भत्ता मिळत आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीसह सर्व कामगारात प्रचंड नाराजी आहे.

महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांना इतर ‘ड’ महानगरपालिकेप्रमाणे पेट्रोल अलाउन्स मिळण्याचे आदेश व्हावे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता फरकासह मिळावा, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मंजूर असलेली १०,२०,३० ची पदोन्नती तातडीने मिळावी, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचा-यांना दि. १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ मंजूर करावी. दि. ६ एप्रिल १९९५ नंतरच्या २४९ बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्त प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा. या व अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी कार्याध्यक्ष शेषराव शिरसट, बाबासाहेब क्षीरसागर, अजय क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, अनिल जगझाप, विठोबा शिदीबंदी, अनिल बनसोडे, उमेश गायकवाड, दत्ता तुळसे, प्रकाश सोनवणे, विद्यासागर मस्के, सतीश नागटिळक, राहुल बनसोडे, अंबादास डावरे आदींसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कामगार संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, महापालिका आयुक्त यावर बैठक घेत नाहीत, केवळ सोमवार आणि गुरुवारी जनता दरबारात भेटण्याचे नियोजन ठेवले आहे हे योग्य नाही. १५ ऑगस्टपूर्वी आयुक्तांनी बैठक घेऊन या मागण्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा धरणे व संप आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी आयुक्तांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा अशोक जानराव यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR