नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (आप) संजय सिंह यांच्या जागी खासदार राघव चढ्ढा यांची राज्यसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, आप पक्षाच्या नेतृत्वाने म्हटले आहे की ‘आरोग्यविषयक समस्या’ असलेल्या संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चढ्ढा या पुढे वरच्या सभागृहात पक्षाचे नेते असतील. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. ईडीने २०२१-२२ दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात आप खासदार संजय सिंह याना अटक केली आहे.
वृत्तसंस्थेने सांगितले की, राज्यसभा सचिवालयायातील सूत्रांनी चड्ढा यांचे सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबतचे आपकडून पत्र प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे. हे पत्र अंमलबजावणीसाठी राज्यसभेच्या महासचिवांकडे आहे. तसेच ‘आप’ने दिल्ली मद्य धोरण प्रकरणाला “राजकीय षडयंत्र” म्हटले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील आरोपी अरोरा याने दोन वेळा सिंह यांच्या घरी २ कोटी रुपये रोख दिल्याचे तपासात समोर आले आहे. ही रोख ऑगस्ट २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान वितरित करण्यात आली.