धाराशिव : प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नागपूर व वर्धा जिल्हा बँकेप्रमाणे या बँकेवर शासनाने पालक अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक सुनिल शिरापूरकर यांची उस्मानाबाद जिल्हा बँकेवर पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत शुक्रवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ, सर्व कर्मचारी, गट सचिव व संस्था सचिव यांची शुक्रवारी (दि.७) त्यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी त्यांनी बँकेला पुनर्जीवन करण्यासाठी बँकेने करावयाच्या उपायोजनाबाबत माहिती दिली, याची सुरुवात पालक अधिकारी म्हणून मी स्वत: बँकेत ठेव ठेवणार असल्याचे सांगून बँकेतील सर्व कर्मचा-यांनी पाच लाख, गट सचिव व संस्था सचिव यांनी तीन लाखाच्या ठेवी बँकेत कराव्यात, असे आवाहन केले.
यावेळी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, व्हा. चेअरमन मधुकर मोटे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी चेअरमन बापूराव पाटील, व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, व सर्व संचालक हे बँकेस भाग भांडवलापोटी ६८ कोटी, कारखान्याच्या थकहमी पोटी २३४ कोटी व बँकेस सॉफ्ट लोन २०० कोटी मिळण्यासाठी प्रशासनाकडे प्रयत्न करीत आहेत. यासाठीचे सर्व प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक व सहकार आयुक्त कार्यालयाने त्यांचे सकारात्मक शे-यासह बँकेस निधी उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पाठविला असून निधी लवकर उपलब्ध होणे अपेक्षित असल्याचे सभेस अवगत करून दिले.
पुढे बोलताना पालक अधिकारी शिरापूरकर यांनी संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, गट सचिव व संस्था सचिव यांना मार्गदर्शन केले. शाखेने प्रत्येक महिन्याला ५० बचत खाते, १० चालू खाते उघडावे, पिग्मी गोळा करावी, आरटीजीएस चालू करावे, एसएमएस सुविधा चालू करावी, शाखेतून शेतक-यांना सातबारा उतारे बाहेरच्या दरापेक्षा कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावे, बँकेकडे उपलब्ध असलेल्या ए.एटीएम व्हॅन द्वारे आठवडी बाजार, यात्रा या ठिकाणी या व्हॅनचा वापर करून बँकेबाबत सकारात्मक संदेश गावागावांमध्ये द्यावा, अशा सूचना अधिकारी व कर्मचा-यांना दिल्या व या कामकाजाबाबतचा आढावा प्रत्येक महिन्याला पालक अधिकारी म्हणून बँकेमध्ये घेतला जाणार असल्याचे सूचित केले.
त्याचबरोबर नागरी बँका पतसंस्था यांचे व्यवहार पूर्वत बँकेमार्फत चालू करण्यासाठी बँकेने प्रयत्न करावे. शहरातील पेट्रोल पंप, मोठे व्यापारी यांना भेटून बँकेमध्ये असलेल्या सुविधांची माहिती देऊन पेट्रोल पंपाचे व्यवहार उस्मानाबाद जिल्हा बँकेमार्फत चालू करण्यासाठी विनंती करावी. जेणेकरून बँकेमध्ये व्यवहार वाढीसाठी प्रयत्न होतील.
पालक अधिकारी यांनी बँकेच्या संचालकांनीही बँकेत ठेवी ठेवाव्यात अशी विनंती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्याकडे केली. या विनंतीस मान देऊन बापूराव पाटील यांनी लवकरच सर्व संचालकांच्या ठेवी बँकेमध्ये असतील असे पालक अधिकारी यांना आश्वासित केले. बँकेचे कर्मचारी सध्या वसुली कामकाज करीत असून चालू बाकीदाराची वसुली झाल्यानंतर थकबाकीत गेलेल्या सभासदांच्या वसुलीसाठी बँक प्रयत्न करणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी पालक अधिकारी यांना अवगत करून दिले. शेवटी बँकेच्या संचालक नानासाहेब पाटील यांनी चेअरमन यांनी संचालकांनी किती रकमेच्या ठेवी ठेवायच्या याबाबत आदेश द्यावे, त्या आदेशानुसार सर्व संचालक बँकेत ठेवी ठेवतील असे पालक अधिकारी यांना आश्वासित केले. व पालक अधिकारी यांना वेळोवेळी यांचे मार्गदर्शन करावे अशी विनंती केली.