नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२२च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीतही यशस्वी ठरलेल्या ४९८ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश अखेर प्रशासनाने निर्गमित केले. परीक्षेतील गट ‘अ’च्या २२९ आणि गट ‘ब’च्या २६९ उमेदवारांचा यात समावेश आहे. वर्षभरापासून हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.
‘एमपीएससी’ने २०२२ साली राजपत्रित व अराजपत्रित अशा ६२३ जागांसाठी काढलेल्या जाहिरातीनंतर पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात मुलाखती घेण्यात आल्या. १८ जानेवारीला गुणवत्ता यादी आणि २४ मार्चला अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. या उमेदवारांच्या नियुक्त्या प्रशासकीय कारणांमुळे अडकून पडल्या होत्या. हे उमेदवार वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांना नैराशाही आली होती.
अखेर सामान्य प्रशासन विभागाने त्यातील ४९८ उमेदवारांना नियुक्त करण्याची घोषणा केली. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ‘एक्स’वर ट्वीट करून माहिती दिली व नियुक्त्या मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदनही केले आहे.
कुठे झाल्या नियुक्त्या?
एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गट अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी आदी संवर्गांतील पदांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
लवकरच पदभारही स्वीकारणार
नियुक्तीच्या आदेशामुळे प्रतीक्षेतील भावी अधिका-यांचा पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राप्त अहवाल विचारात घेऊन राजपत्रित संवर्गाच्या २२९ उमेदवारांना त्यांच्या नमूद पदावर २ एप्रिल २०२५ पासून एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी)अंतर्गत सीपीटीपी-१० या तुकडीअंतर्गत दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येईल.