24.9 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता

राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता

भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अकृषी विद्यापीठातील प्राध्यापकपदाच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली असून निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी दिली.

राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण तर मुलाखतीसाठी २०टक्के गुण देण्यात येणार आहे. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र असतील असे पाटील यांनी स्पष्ट केले.

अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्राविण्य यांचे मूल्यमापन परिसंवाद अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक, अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येतील. निवड समितीच्या बैठकांचे दृक-श्राव्य चित्रिकरण करण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृक-श्राव्य चित्रिकरण, बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुस-या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रकिया सहायक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील असेही पाटील यांनी सांगितले.

नवीन निवडप्रक्रियेच्या अधीन राहून विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणा-या विद्यापीठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेसाठी याच कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये पारदर्शक आणि जलद निवड प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित प्राध्यापकांची निवड होईल. तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR