मुंबई : प्रतिनिधी
अर्थमंत्री ठरवतील त्यांना पैसे अशा पद्धतीने अर्थखाते चालू शकत नाही. विरोधकांना तर निधी मिळतच नाही. पण भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनाही दिल्लीतील नेत्यांकडे अर्थमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी कराव्या लागत आहेत. कोणाला किती पैसे द्यायचे हे एकटे अर्थमंत्री कसे काय ठरवू शकतात? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
आज विधानसभेत गृह, कृषी, पशुसंवर्धन आदी खात्यांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी या चर्चेत सहभागी होताना जाधव यांनी वित्त विभागाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. कोणाला किती निधी द्यायचा याचा लेखाजोखा अर्थसंकल्पात असतो. कोणत्या मंत्र्याला, कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा ते अर्थमंत्री ठरवतात. पण आता सरकारमध्ये निधी वाटपावरून आपापसात तक्रारी सुरु झाल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे लोक दिल्लीतील नेत्यांकडे अर्थमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी करीत आहेत.
अर्थमंत्री ठरवतील त्यांनाच फक्त पैसे अशा पद्धतीने अर्थखाते चालू शकत नाही. गुहागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कशा प्रकारे निधी नाकारला त्याचे उदाहरण जाधव यांनी दिले. रत्नागिरीतल्या नऊपैकी ८ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. फक्त गुहागर तालुक्यात पुतळा नाही. त्यासाठी मी अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र दिले. गुहागरमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी केली. पण अजित पवार यांनी होकारही दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत तरी राजकारण करू नका, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
पोलिस पर्यटनाला जातात काय?
गृह खात्यावर बोलताना जाधव यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका करताना त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले मात्र त्यांनी साधे उत्तर देखील दिले नाही, माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, साधी विचारपूस देखील त्यांनी केली नाही. दादरला शिवसेना भवनाच्या बाहेर पार्क केलेल्या त्यांच्या मोटारीची टकटक गँगने काच फोडली. आणि मोटारीत ठेवलेली विधिमंडळ अधिवेशनाची कागदपत्रे चोरांनी चोरली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी टकटक गँगच्या शोधासाठी पाच पथके नेमली. या घटनेला दीड वर्ष झाले तरी अद्याप टकटक गँगचा पत्ता लागलेला नाही. अलीकडे काही घडले की लगेच पोलिसांचे पथक नेमले जाते. बीडमध्ये वाल्मिक कराडचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली. पण वाल्मिक कराड स्वत:हून पोलिसात हजर झाला. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला सरकारने पोलिस पथक नेमले आरोपी घरी सापडला. मग ही पोलिस पथके नेमकी करतात काय ? सरकारच्या पैशाने पर्यटनाला, सहलीला जातात काय? असा बोचरा सवाल भास्कर जाधव यांनी केला.