लातूर : प्रतिनिधी
ज्या ठिकाणी ग्रंथ असतात ते ग्रंथालय. त्या ग्रंथालयात आपल्याला ग्रंथसूची पाहून पुस्तकाची ओळख होते. अगदी तसेच विद्यार्थ्यांना झाडांची ओळख व्हावी, झाडांचे औषधी महत्व तसेच पर्यावरणातील महत्व कळावे यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या अभिनव वृक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले.
देवराई फॉउंडेशन, थेऊर-पुणे यांच्या वतीने शाळा-महाविद्यालयात देशी आणि दुर्मिळ प्रजातीची १०० प्रकारची रोपे कुंड्यात लावून माहितीपत्रकासह ठेवण्यात येतात. ही ठेवलेली रोपे विद्यार्थी जतन करतील, रोज पाहतील आणि त्यातून त्यांना झाडांची ओळख तसेच माहितीही होईल. याचाच एक भाग म्हणून लातुरमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयात वृक्षालय ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात दि. ७ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच वृक्ष प्रतिष्ठान, लातूर यांच्या सदस्यांनी पिशवीत असलेली १०० रोपे कुंडीत लावून केली.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही अत्यंत अभिनव संकल्पना असल्यामुळे वेळातला वेळ काढून प्रोत्साहन दिले. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड चळवळ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दुर्मिळ वृक्षारोपण, दुर्मिळ बीज बँक, असे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे राजश्री शाहू महाविद्यालय हा पॅटर्न आहे, आता या दुर्मिळ वृक्षालय युवकांमध्ये पर्यावरणीय महत्व, दुर्मिळ वृक्षाचे त्यातील महत्व, परिस्थितीकी याचे महत्व कळण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल इतर महाविद्यालयांनीही वृक्षालय ही संकल्पना राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव गव्हाणे, नगर विकास प्रशासन विभागाचे सहआयुक्त्त रामदास कोकरे, वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.