मुंबई : मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी आपल्यातील मतभेद मिटवून एकत्र आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांची उद्धवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या दोन पक्षांच्या युतीने या निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजप-शिंदेसेनेच्या महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
मराठीच्या मुद्यावरून झालेली ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये भाजपची डोकेदुखी वाढवणार अशी चिन्हे दिसत असताना भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधुंच्या ऐक्यावर टीका केली आहे. सत्तापिपासूपणा या एकमेव भावनेपोटी दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का? असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. यावेळी शेलार म्हणाले की ठाकरे बंधू एकत्र आले याचा आनंद आहे. कुटुंब व्यवस्थेवर काम करणारी आम्ही संघाची मंडळी आहोत. त्यामुळे कुटुंब एकत्र आल्याचा आनंद सर्वांनाच आहे. कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. पण मुळाशी प्रश्न हा आहे की, तुम्हा दोघांना वेगळे केले कुणी? तुम्ही स्वार्थापोटी वेगळे झालात. तसेच आता १०० टक्के स्वार्थासाठी एकत्र आला आहात. सत्तापिपासूपणा या एकमेव भावनेपोटी दोन ठाकरे बंधूंचे फोटो एकत्र आले आहेत. दुसरे काही नाही, असा दावा शेलार यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, त्यावेळी ठाकरे बंधूंनी वेगळे व्हावे म्हणून मराठी माणसांनी आंदोलन केलं होतं का? तुम्ही का वेगळे झालात? कलह कुठे होता? अहंकार कुठे होता? स्वार्थ कुठे होता? शिवसेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे यांनी केलेले भाषण काढा. ती मंडळी ज्यामुळे मी गुदमरतोय , हा माझा शब्द आहे, त्यांचा नाही, नाही तर त्यावरून वाद होईल. ती मंडळी अजूनही आहेत ना? मग ती आता मोकळा श्वास देताहेत की च्यवनप्राश देताहेत? म्हणून हा भंपकपणा आहे, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

