27.3 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeराष्ट्रीयराज्यसभेत खरगे आणि सभापतींमध्ये वादावादी

राज्यसभेत खरगे आणि सभापतींमध्ये वादावादी

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी २ जुलै रोजी राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वादावादी झाली. खरगे यांनी चर्चेदरम्यान धनखड यांना सांगितले की, तुम्ही नव्हे, तर सोनिया गांधींनीच मला काँग्रेस अध्यक्ष केले. त्यावर उत्तर देताना सभापती धनखड यांनी तुम्हाला कोणी बनवले हे तुम्हाला माहीत असे खरगे यांना सुनावले. पण तुम्ही प्रत्येक वेळी चेअरचा अपमान करू शकत नाही. या देशाच्या आणि संसदीय लोकशाहीच्या आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या इतिहासात सभापतींची तुमच्याइतकी अवहेलना कधीच झाली नाही.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन करताना खासदार प्रमोद तिवारी बोलत होते. दरम्यान, सभापती धनखड यांचा मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार जयराम रमेश यांच्याशी वाद झाला. धनखड म्हणाले की, जयराम रमेश वारंवार त्यांना अडवत होते. जयराम स्वत: बोलायला उभे राहिले तेव्हा धनखड म्हणाले, ‘जयराम रमेश, तुम्ही हुशार आहात, प्रतिभावान आहात, तुम्ही ताबडतोब येऊन खरगे यांची जागा घ्या, कारण तुम्ही खरगे यांचेच काम करत आहात.

त्यावर खरगे म्हणाले, हे बघा, तुमच्या मनात छापलेली ही जातिव्यवस्था इथे मध्ये आणू नका. म्हणूनच तुम्ही रमेश यांना समजूतदार आणि हुशार म्हणत आहात आणि मला मूर्ख म्हणत आहात, जेणेकरून ते माझी जागा घेऊ शकतील. खरगे यांना काय म्हणालो ते समजले नाही आणि माझ्या बोलण्याचा त्यांनी चुकीचा अर्थ काढला, असे धनखड म्हणाले. यानंतर खरगे म्हणाले की, हे पद मला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहे.

सोनिया गांधींनी मला अध्यक्ष केले आहे. हे पद देण्याचा अधिकार फक्त सोनिया गांधींना आहे, धनखड किंवा जयराम रमेश यांना नाही. जनतेने मला घडवले आहे. त्यावर धनखड यांनी खरगे यांना सुनावले की, मला त्या पातळीवर यायचे नाही. तुम्हाला कोणी बनवले हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही प्रत्येक वेळी चेअरचा अपमान करू शकत नाही. प्रत्येक वेळी खुर्चीचा अपमान करू शकत नाही. मी काय म्हणतोय ते न समजता तुम्ही अचानक उभे राहता आणि तुमच्या मनात येईल ते बोलायला सुरुवात करता असे धनखड यांनी सुनावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR