नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून २०२३ या वर्षासाठी क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावर्षी २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपती भवनात ९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील.
तसेच दोन बॅडमिंटनपटूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज अशी या खेळाडूंची नावे आहेत. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणार्या इतर खेळाडूंमध्ये आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), ईशा सिंग (नेमबाजी) आणि पवन कुमार (कबड्डी) यांचा समावेश आहे. क्रीडा आणि खेळ २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहेत.