लाहौर : पाक लष्कराने १९९९ मध्ये भारताविरुद्ध कारगिल युद्धाचा कट रचला. त्याला मी विरोध केल्यानेच लष्कराने मला पंतप्रधानपदावरून हटविले असे खळबळजनक विधान नवाज शरीफ यांनी केले आहे. मला दरवेळेला पदावरून का काढले जाते, तेच कळत नाही. भारतासोबत जिव्हाळ्याचे संबंध आम्हाला निर्माण करावेच लागतील, हे माझे म्हणणे पाकिस्तानच्या हिताचेच आहे असेही शरीफ म्हणाले.
लाहौर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनीच मला पदावरून हटविले. मी पंतप्रधान असताना भारताचे दोन पंतप्रधान (अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी) पाकिस्तानच्या भूमीवर आले. ते पाकिस्तानातील दुष्प्रवृत्तींना सहन झाले नाही. पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा केवळ शेजा-यांशी भांडणांमुळे वाढीव लष्करी खर्चामुळे झालेली आहे. इम्रान खान यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले, त्यांना केवळ क्रिकेट आणि चंगळ कळते. देश कसा चालवावा, यातले तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारातले काहीही कळत नाही. भारताविरुद्ध गरळ ओकली की, इथे राजकारणात स्थिरावता येते, हा आपल्याकडे काही लोकांचा समज बनलेला आहे. इम्रानही त्याला अपवाद नाहीत, असेही शरीफ म्हणाले.